जि.प.च्या दिव्यांग कल्याण निधीसाठी ग्रेडेशन प्रमाणपत्राची अट रद्द करा
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन
वाशीम - जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षाची दिव्यांग कल्याण निधीची योजना सन २०२०-२१ मध्ये कार्यान्वीत केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी आरक्षीत दिव्यांग कल्याण निधी वाटप करतांना दिव्यांग बचत गटांना मागणी केलेली ग्रेडेशन प्रमापत्राची अट रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात १३ मे रोजी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनिष भा. डांगे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याण निधीमध्ये आरक्षीत केलेला १९ लाख २० हजार रुपयाचा निधी सन २०२०-२१ या वर्षात दिव्यांगांना वैयक्तीक व दिव्यांग बचत गटांना उतरत्या क्रमानुसार वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावर ग्रामसचिव यांच्यामार्फत अर्ज करण्याची मुदत १२ मे एवढी होती. मात्र सध्या ही मुदत १५ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. हा निधी प्राप्त करण्यासाठी वाशीम जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने घोषीत केलेल्या दिव्यांग कल्याण निधीमध्ये वैयक्तीक लाभाचे व दिव्यांग बचत गटाचे अर्ज २०१९-२० या वित्तीय वर्षात आरक्षीत असलेल्या निधीबाबत घेण्यात आलेल्या योजनेमध्ये दिव्यांग बचत गटांना ग्रेडेशन प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. तिसरे लॉकडाऊन सुुरु असतांना या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेची मुदत १२ मे अर्ज स्विकारण्याकरीता ठेवण्यात आली होती. संघटनेच्या निदर्शनास असे आले आहे की, दिव्यांग बचत गटाचे बरेच अर्ज प्रकल्प अधिकारी यांचा संपर्क न होवू शकल्यामुळे व काही लाभार्थींनी त्यांना इथे येण्याचे साधन नसल्यामुळे अर्ज सचिवापर्यत दिले. त्यामुळे ग्रेडेशन प्रमाणपत्राची अट शिथील करुन संबंधीतांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी. लॉकडाऊन काळात दिव्यांगांचे होणारे हाल बघता वरील अट शिथील करुन दिव्यांगांना त्वरीत दिव्यांग निधी वाटपाची कार्यवाही सुरु करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जि.प.च्या दिव्यांग कल्याण निधीसाठी ग्रेडेशन प्रमाणपत्राची अट रद्द करा : राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे निवेदन